गाडीचा हॉर्न वाजवल्यावरुन वाद; पुण्यातील भवानी पेठेत कपडे फाटेपर्यंत फ्री-स्टाईल हाणामारी

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भवानी पेठ परिसरात केवळ गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. या झटापटीत काहींचे कपडे फाटेपर्यंत धक्कादायक प्रसंग घडले असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचार्याला हॉर्न दिला. यावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच उग्र रूप धारण करत गटागटात हाणामारीत रूपांतरित झाला. पाहता पाहता परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
हाणामारीमध्ये सहभागी दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. हाताने, लाथांनी आणि लाठी-काठ्यांनी झालेल्या या मारामारीत काहींचे कपडे फाटले, तर काही जखमीही झाले आहेत. ही घटना इतकी अचानक आणि प्रचंड होती की, काही वेळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
पोलीसांनी घेतली तत्काळ दखल
घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून हा वाद पूर्णपणे क्षुल्लक कारणावरून वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी हिंसाचार – गंभीर चिंतेचा विषय
सार्वजनिक ठिकाणी केवळ हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून अशा प्रकारचा हिंसाचार घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि रस्त्यावरचे वाद नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जातील याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागून आहे.