दुष्काळात तेरावा… बीडमध्ये आता पाण्याची चोरी, वृद्ध दाम्पत्याच्या विहिरीतील अडीच परस पाणी पळवलं

बीड : उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी मैल न मैल भटकंती होत असून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी महिला जीवावर उदार झाल्याचं नाशिकमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून आपण पाहिलं होत. मराठवाड्यातही पाण्यासाठी भीषण परिस्थिलीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच, बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात विहिरीतील पाणी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. आधीच पाणीटंचाईने शेतकरी त्रस्त असताना वयोवृद्ध काशीद दांपत्य या प्रकारामुळे हतबल झाले आहे.
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात त्रिंबक काशीद आणि त्यांची पत्नी रंभा काशीद शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, रात्रीतून अज्ञातांनी विहिरीतील पाणी टँकरमध्ये लंपास केले आहे. सकाळी फळबागेला पाणी देण्यासाठी हे दांपत्य आले असता विहिरीत पाणीच नसल्याने पाणीचोरीचा हा प्रकार उघड झाला आहे. विहिरीत अडीच परस पाणी साचवून ठेवलं होतं, पण कुणीतीर मोटार चालू करून, लॉक तोडून हे पाणी चोरी करण्यात आल्याने वृद्ध शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. विहिरीतून 2-3 टँकर भरुन पाणी नेलं आणि बाकी पाणी सोडून दिलं, असेही त्र्यंबक काशीद यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगतिले.
आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या आंब्याच्या फळबागेला जोपासण्यासाठी या दांपत्याने अडीच परस पाण्याची साठवणूक केली होती. फळबागेसह याच पाण्यावर पशुधन देखील जगवायचे होते. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून खोडसाळपणा करत हा प्रकार करण्यात आला. विहिरीतील पाणीच चोरीला गेल्याने वयोवृद्ध काशीद दांपत्य हताश आणि हतबल झाले आहे. घडलेला प्रकार सांगताना रंभा काशीद यांना अश्रू अनावर झाले होते. याप्रकरणी, पोलीसात तक्रार नोंदवण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, शेतातील विहिरीतून पाणी चोरल्याबद्दल गुन्हा दाखल होतो की नाही, हे पाहावे लागेल.