धारणीत मोठे जल संकट, पाणीपुरवठा योजना मेळघाट फेल

धारणी : धारणी मुख्यालयापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर वसलेलं बारू गाव आज भीषण जलसंकटाच्या गर्तेत सापडलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णपणे बंद असून, ग्रामस्थांना रोजच्या रोज पाण्यासाठी झगडावं लागत आहे.
कोट्यवधींचा निधी मंजूर – पण पाइपलाइन कोरडीच!
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने लाखो-कोटींचा निधी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पाइपलाइन कार्यरत नाही. संपूर्ण गावात एकमेव जुनी विहीरच पाण्याचा स्रोत आहे, आणि त्यावरच संपूर्ण वस्ती अवलंबून आहे.
“हे शासन आमचं काय पाणी प्यायला तरी देणार आहे का?”
असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे. दररोज महिलांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागतं, उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात, तरीही संपूर्ण पाणी मिळेल याची शाश्वती नाही.
मेळघाटमधील ग्रामीण पाणी योजना फेल?
पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अकार्यक्षमता व भ्रष्टाचार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “फाईल पुढं सरकत आहे” या यंत्रणांच्या ठराविक उत्तरामुळे संतप्त जनतेचा संयम सुटत चाललाय.
नवनियुक्त आमदार केवलराम काळेंकडे आशेने नजर
गावकऱ्यांनी आता नव्याने निवडून आलेल्या आमदार केवलराम काळे यांच्याकडे आशेने पाहिलं आहे. या प्रकरणात जलभ्रष्टाचाराची चौकशी आणि पाणी पुरवठा योजना सुरु होण्यासाठी त्यांचं पुढाकार घेणं आवश्यक ठरणार आहे.