भातकुलीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

भातकुली : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात खरीप हंगाम 2025 संदर्भातील नियोजन आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सुधारित उपाययोजनांवर भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बी-बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबत थेट अल्पभूधारक शेतकरी जीवन सरदार यांनी सवाल केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “खतासाठी जास्त पैसे दिले तरच युरिया वेळेवर मिळतो, अन्यथा तुटवडा भासत असल्याचे दिसते.” यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.
याच बैठकीत पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. पिक विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित असूनही नुकसान भरपाईबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही, यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.