सोशल मीडियावरील ‘चेक इन’मुळे तुमच्या घरावर पडू शकतो दरोडा; उन्हाळ्यात तर धोका अधिक

दैनंदिन कामातून उसंत मिळाल्यानंतर अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळतात. बरं, आपण नेमके कुठे चाललो आहोत याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस किंवा पोस्टमधून अपडेट करण्याचीही अनेकांचीच सवय. पण, हेच स्टेटस अपडेट करणं तुमच्या संकटांमध्ये भर टाकू शकतं याची कल्पना आहे का?
एका सोशल मीडिया पोस्टमुळं घरावर पडू शकतो दरोडा
सुट्टीच्या निमित्तानं जेव्हा सहकुटुंब सहपरिवार अनेक मंडळी घरावर कुलूप लावून भटकंतीसाठी बाहेर पडतात तेव्हा याच काळादरम्यान बहुतांश घरांवर दरोडा पडल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच मुंबई पोलिसांनी गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आणि 2023 नंतर या प्रकरणांमध्ये घट झाली, मात्र धोका कायम राहिला.
घरावर पडणाऱ्या या दरोड्यांचं थेट कनेक्शन हे (Social Media) सोशल मीडिया पोस्टसोबतही आहे. कारण, बऱ्याच नेटकऱ्यांना आपण कुठे जातो, कुठे राहतो, इथपासून प्रवासाचा पुढचा टप्पा काय असेल इथपर्यंतची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय असते. लाईक आणि शेअरच्या हव्यासापोटी केलेल्या याच पोस्टमुळं घरावर दरोडा पडण्याचा धोका आणखी वाढतो.
अप्रत्यक्षरित्या ही मंडळी त्यांचं लोकेशन, ते कुठं आहेत हे जगाला सांगत असताना घरी कुणी नाही हेसुद्धा नकळतच सांगतात आणि इथंच चोरट्यांचं फोफावतं. सायबर भामटेसुद्धा अशा पोस्टवर नजर ठेवत आपला कावेबाजपणा साधतात आणि घरांवर दरोडा घालतात. त्यामुळं भटकंतीसाठी गेलं असता सोशल मीडियावर ‘चेक इन’ करण्याच्या वेडाला आळा घाला.
पोलिसांची आकडेवारी काय सांगते?
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात एकट्या मुंबईत 257 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यापैकी 149 गुन्ह्यांची उकल झाली. सर्वाधिक गुन्हे हे रात्रीच्या वेळी घडल्याचंही या आकडेवारीतून समोर आलं. चोरट्यांचा सुळसुळात वाढत असल्यामुळं आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त विविध परिसरांमध्ये वाढवण्यात आली आहे.
बाहेरगावी जाताना काय काळजी घ्यावी?
सहसा लांबच्या प्रवासाला किंवा मोठ्या सुट्टीला सहकुटुंब जात असताना विश्वासार्ह शेजाऱ्यांना आपल्या प्रवासाची कल्पना देत घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावं. कोणीही अनोळखी व्यक्ती घरापाशी दिसल्यास त्याची माहिती दूरध्वनीद्वारे द्यावी असंही त्यांना सांगावं. घरात असणारे दागदागिने, रोकड सुरक्षित स्थळी किंवा बँकेत लॉकरमध्ये सुखरुप ठेवावी आणि सोशल मीडियावर सेकंदा-सेकंदाचे अपडेट पोस्ट करणं टाळावं.