Solapur Crime: बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टरचा मृतदेह, बाजूला चाकू अन् कात्री; आत्महत्या की हत्या? मृत्यूचं गूढ वाढलं

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. शिरष वळसंगकर यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकलले नाही, अशातच आणखी एका डॉक्टरच्या आत्महत्येच्या बातमीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका शिकाऊ डॉक्टरनं भाड्याच्या रूममध्येच स्वत:ला संपवलं आहे. गळा चिरून त्याने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी एक चाकू आणि कात्री सापडली आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉ. आदित्य नमबियार असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचं नुकतंच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. तो शिकाऊ डॉक्टर होता. घरापासून दूर तो सोलापुरात एका खोलीत भाड्याने राहत होता. मात्र, भाड्याच्या घरातीलच बाथरूममध्ये त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, मृतदेहा शेजारीच चाकू आणि कात्री आढळल्याने या प्रकरणाचे आणखी गुढ वाढले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच त्याच्या खोलीची चौकशी केली. आदित्यने आत्महत्या का केली? ही आत्महत्या आहे की हत्या? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोटही सापडली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी एका महिलेचा उल्लेख केला होता. वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी एका डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.