अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा; महापालिकेची धडक मोहीम
शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम
अमरावती : शहरातील अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असताना, आता अमरावती महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर आणि उघड्या जागांवर वाढलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा जोमात सुरू झाली आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने चित्रा चौक, इतवारा बाजार, टांगा पडाव, चांदनी चौक, नागपुरी गेट, जमील कॉलनी, वलगाव रोड या भागांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केली. या मोहिमेसाठी जेसीबी मशीन आणि ५ ट्रकची मदत घेण्यात आली.
अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा पालिकेकडून कडक कारवाई केली जाईल व कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल.” या इशाऱ्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांनी भीतीपोटी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.
या कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, उप अभियंता विवेक देशमुख, निरीक्षक अन्सार अहमद, तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या मते, शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारात लवकरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला उपनगरांमधील अतिक्रमणे हटवून मग मुख्य शहरात कारवाईचा फड उघडणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.