नागपूर शहर गुन्हे शाखेने केला अल्पवयीन वाहन चोराच्या टोळीचा पर्दाफाश

नागपूर : गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने मानकापूर परिसरात मोठी कारवाई करत एकाच वेळी चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पागलखाना दरगाह परिसरात चार अल्पवयीन मुलांची संशयास्पद हालचाल दिसून आली. चौकशीअंती त्यांच्या ताब्यातील वाहनांसंदर्भात कोणतीही कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत त्यांनी ही वाहने चोरीची असल्याची कबुली दिली.
ही वाहने नागपूर शहरातील अजनी, गिट्टीखदान, बजाजनगर व वाडी पोलीस ठाण्यांतून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित वाहनांची पोलिसांनी जप्ती केली असून, ती संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
चारही अल्पवयीन विधी संघर्ष बालकांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोली, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उप आयुक्त राहुल माकणीकर व सहाय्यक आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट ५ च्या या धडक कारवाईमुळे नागपूर शहरातील वाहन चोरीच्या साखळीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार आहे.