नाशिकच्या रामकुंडावरून पाय घसरला, तरुण गोदापात्रात गेला वाहून

नाशिक : नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरल्याने तो क्षणार्धात गोदावरीत वाहून गेल्याची घटना समोर आलीय.बीड जिल्ह्यातील हा तरुण पाय घसरून थेट गोदावरी नदीत पडला आणि क्षणातच नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलाय. गोदावरी नदीच्या पात्रात सध्या तब्बल 1 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. हा तरुण गोदावरीत पडल्याने वाहून गेला असून, अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
गोदावरी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पानवेलींचे जाळं तयार झालं असून, त्या पानवेलीत हा तरुण अडकलेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. JCB च्या सहाय्याने नदीतून पानवेली हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली असून, प्रवाहातील प्रत्येक संभाव्य भागाची तपासणी केली जात आहे. श्राद्धपक्षामुळे रामकुंड परिसरात मोठी वर्दळ असतानाच ही दुर्घटना घडल्याने परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे.
नक्की घडलं काय?
नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो गोदावरी नदीत वाहून गेला. गोदावरी पात्रात सध्या 1 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रवाह तीव्र असल्याने तरुण क्षणार्धात वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर प्रशासन व स्थानिक आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवण्यात आली मात्र अंधार आणि प्रवाहामुळे अडचणी आल्या आणि तरुणाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पानवेली वाहून आल्या आहेत. त्या पानवेलीत हा तरुण अडकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर पानवेली हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात येत असून, आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलीस दल घटनास्थळी कार्यरत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रामकुंड परिसरात भीतीचं वातावरण आहे. श्राद्धपक्ष असल्याने गोदावरी घाटावर मोठी वर्दळ आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदी पात्रात उतरणे टाळावे, पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.