पत्नीनेच दिली पतीची सुपारी, मावसभावाच्या मदतीने रचला कट

अकोली : अमरावतीत २५ एप्रिल रोजी घडलेली लूटमार प्रकरण आता पूर्णपणे वेगळं वळण घेत असल्याचं समोर आलं आहे. अकोली रेल्वे फाटकाजवळ अजय राठी आणि त्याच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्यामागे कोणी तिसरा नसून, त्याची स्वत:ची पत्नीच असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
हॉकी स्टिकने हल्ला, ९५ हजारांचे दागिने लंपास
दोन अज्ञात हल्लेखोरांनी राठी दाम्पत्यावर हॉकी स्टिकने मारहाण करून तब्बल ९५ हजार रुपयांचे दागिने लुटले. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात उघड झालं कटाचं गूढ
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्पेशल स्कॉडचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकाने कसून तपास सुरू केला. तपासाअंती नागपूर आणि आर्वी तालुक्यातून चेतन टांक, करण मुंदाने आणि स्मित बोबडे या तिघांना अटक करण्यात आली.
पतीच्या जीवावर पत्नीचा कट – मावसभाऊच सहभागी!
प्राथमिक चौकशीत आरोपी चेतन टांकने धक्कादायक माहिती दिली. फिर्यादी अजय राठी याची पत्नी आणि तिचा मावसभाऊ स्मित बोबडे यांच्यातील नातं उघड झालं. पतीकडून मिळणाऱ्या १५ हजार रुपयांच्या महिन्याच्या रक्कमेत खंड पडल्यामुळे आणि मालमत्तेच्या वादातून, पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचला होता.
मोबाईल डिटेल्समधून उघड झाला कटाचा संपूर्ण प्लॅन
पत्नीने स्मित आणि त्याच्या मित्रांना आधी पैसे दिले. नियोजनाप्रमाणे अकोली रेल्वे स्टेशनजवळ गाडी थांबवून हल्ला करण्यात आला. मात्र, तपास यंत्रणांना फसवणं इतकं सोपं नव्हतं. आरोपी महिलेच्या मोबाईलमधून मिळालेले कॉल डिटेल्स, चॅट मेसेजेस आणि व्यवहारामुळे पोलिसांनी कट उघड केला.
पोलिसांची पत्रकार परिषद
या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“पत्नीने मावसभाऊसह पतीवर हल्ल्याची सुपारी दिली होती. तिघांना अटक केली असून आरोपी महिलेसही ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.