भाजप नेते, माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे चेन्नईमध्ये निधन

भाजपच्या संघटन वाढीत महत्त्वाचे योगदान देणारे, माजी आमदार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवारी (ता.३०) आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटर येथे उपचार सुरू होते.
मूळचे वर्धा जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील रहिवासी असलेले रामदास आंबटकर यांनी महाविद्यालयीन दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून कार्याची सुरुवात केली. त्यानंतर २० वर्ष त्यांनी प्रदेश संघटक म्हणून काम करीत 1995 साली विद्यापीठातील पदवीधर प्रवर्गातून नेतृत्व केले.
यादरम्यान ते विविध प्राधिकरणात सदस्य म्हणूनही निवडून आले. 2000 ला स्टॅंडिग कमेटी सदस्य तर 2005 ला व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. मनमिळाऊ, तितकेच कर्तव्यनिष्ठ आणि तरूणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी त्यांनी काम सुरू केले. त्यातही विविध संघटनात्मक जबाबदारी त्यांनी पार पाडल्या.
2018 मध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते विधान परिषदेत दाखल होत आमदार झाले. गेल्यावर्षी कार्यकाळ संपल्यावर ते पुन्हा भाजपच्या संघटनात्मक कार्यामध्ये व्यस्त झाले. काही दिवसांपूर्वी किडनी संबंधित आजाराने त्यांना ग्रासल्याने सुरुवातीला विवेका आणि त्यानंतर एमजीएम हेल्थकेअरला चेन्नई येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची या आजाराने प्राणज्योत मालवली.