महाबोधी विहारच्या ताब्यासाठी अमरावतीत महामोर्चा
अमरावती : अमरावती शहरातील इर्विन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आज भव्य आणि शिस्तबद्ध बौद्ध महामोर्चाला सुरुवात झाली. या महामोर्चाचे नेतृत्व भिक्खू संघाने केले असून, शेकडो अनुयायांनी पांढऱ्या वस्त्रात, एकाच रांगेत, अत्यंत शांततेने सहभाग घेतला.
मोर्चादरम्यान पंचशील, निळे आणि केशरी ध्वज फडकवत संपूर्ण परिसराला धार्मिक रंगत प्राप्त झाली होती. प्रमुख मागणी होती – बिहारमधील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समुदायाला देण्यात यावा आणि सध्याचा प्रशासनिक ऍक्ट रद्द करण्यात यावा.
या मोर्चात खासदार बळवंत वानखडे, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, गुणवंत देवपारे, तसेच विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हात महिलांचा मोठा सहभाग विशेषत्वाने लक्षवेधी ठरला.
मोर्चा Girl’s High School चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला, जिथे भन्ते आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन करत आपली मागणी स्पष्ट केली. शेवटी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बौद्ध समाजाच्या भावना मांडण्यात आल्या.
या शांततेच्या आणि शिस्तबद्ध मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा बौद्ध समाजाकडून व्यक्त केली जात आहे.