मुख्यमंत्र्यांच्या लेकीला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश, दिविजाला मिळाले तब्ब्ल ९२.६०%

Divija Fadanvis SSC Result: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिेशनने (CISCE) आज 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ICSE दहावीचा निकाल जाहीर केला. बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट (cisce.org.) किंवा (results.cisce.org) ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेकीने या बोर्डातून दहावीची परीक्षा दिली होती. तिचा निकालही समोर आलाय. अमृता फडणवीसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लेक दिवीजाच्या दहावी निकालाची गुड न्यूज शेअर केलीय.
दहावीचा निकाल 99.09%
सीआयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 99.09 इतकी नोंदवली गेली आहे. आयसीएसई दहावीत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.37% असल्याने मुलींचे सगळीकडून कौतुक होताना दिसतंय. त्याचवेळी मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 98.84% इतका आहे. यावर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान झाल्या होत्या. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता निकाल जाहीर झालाय.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त शुभेच्छा दिल्या. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा करत गृहप्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी घडल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय. कारण आमची सुकन्या दिविजा ही दहावीच्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.’, असे अमृता म्हणाल्या.