यवतमाळ जिल्ह्यात १४ पाकिस्तानी आणि १ बांगलादेशी नागरिक आढळले; पोलिस यंत्रणा सतर्क

यवतमाळ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यात १४ पाकिस्तानी व १ बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे.
हे सर्व नागरिक टुरिस्ट व्हिसावर भारतात आले असले तरी, सार्क व्हिसा नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यापैकी १२ पाकिस्तानी नागरिकांनी व्हिसा मुदतवाढीसाठी अर्जही दाखल केला आहे. हे नागरिक यवतमाळ शहरासह पांढरकवडा व घाटंजी परिसरात वास्तव्यास आहेत, आणि काहीजण स्थानीक पातळीवर रोजगारही करत असल्याची माहिती पोलिस तपासातून स्पष्ट झाली आहे.
पोलिस तपासाचा भाग
या १४ नागरिकांमध्ये १० जण हिंदू, तर ४ जण मुस्लिम समाजाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या सर्वांच्या कागदपत्रांची व व्हिसा वैधतेची कसून तपासणी सुरू आहे. या नागरिकांनी स्थानिक जनजीवनात मिसळल्यामुळे, त्यांचा शोध घेणे व सतत नजर ठेवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया
बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात शोधमोहीम राबविण्यात येत असून, केंद्र शासनाच्या पुढील आदेशानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. चिंता यांनी दिली आहे.