अकोल्यात भव्य शासकीय सोहळ्यात महाराष्ट्र दिन साजरा; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोला : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा भव्य सोहळा पार पडला. उत्साही वातावरणात झालेल्या या शासकीय कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर भव्य पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी आपल्या भाषणात मंत्री फुंडकर यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसा, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरांवर प्रकाश टाकत राज्याच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. “महाराष्ट्राचा इतिहास संघर्ष, त्याग आणि संघटनेचा आहे. आजच्या पिढीनेही ही मूल्यं जपून राज्याच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे,” असं ते म्हणाले.
महाराष्ट्र दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम
या शासकीय सोहळ्याच्या निमित्ताने आज अकोल्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. लोकनृत्य, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, संगीत कार्यक्रम, वेशभूषा प्रदर्शन आदींचा समावेश असलेल्या या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र दिनाला खास उत्सवमय रंग चढला आहे.
शास्त्री स्टेडियम परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. परिवारासह आलेल्या नागरिकांनी उत्साहात ध्वजारोहण सोहळा अनुभवला.