तिवसा पंचायत समितीवर युवक काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

तिवसा : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने 1 मे रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीवर युवक काँग्रेसतर्फे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रलंबित देयकांच्या विरोधात करण्यात आले.
कामगारांनी “देयक नाही तर भीक तरी द्या” अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलनावेळी कामगारांच्या हातात झोळ्या, थाळ्या आणि घोषणाफलक होते, ज्यातून त्यांनी आपली व्यथा मांडली.
हे आंदोलन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील शेकडो कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कामगारांनी यावेळी शासनाने लवकरात लवकर त्यांचे देयक अदा करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
प्रतिनिधी – जयंत निखाडे