मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन
अमरावती : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून आता गंभीर आणि खर्चिक आजारांवरील उपचारासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ ‘एक खिडकी प्रणाली’ अंतर्गत एका ठिकाणी मिळणार आहे.
या कक्षामुळे आधी मंत्रालय गाठावे लागणाऱ्या रुग्णांना आता जिल्ह्याच्या ठिकाणीच शासकीय मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. १ मे २०२५ पासून ही सुविधा राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध झाली असून, लवकरच ही सेवा ऑनलाईन स्वरूपात देखील सुरू होणार आहे.
४७ रुग्णांना मदत, १५ जणांवर मोठ्या शस्त्रक्रिया
या कक्षाने २७ मार्च ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत एकूण ४७ रुग्णांशी संपर्क साधला. त्यापैकी १५ रुग्णांवर मेंदू, कॅन्सर, प्लास्टिक व हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित रुग्णांना मोफत औषधोपचार, कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट आणि वैद्यकीय मदतीचे इतर लाभ देण्यात आले.
‘आरोग्यदूत’ संकल्पनेद्वारे गावागावात पोहोचणार आरोग्यसेवा
या कक्षाअंतर्गत राबवण्यात येणारी ‘आरोग्यदूत’ संकल्पना गावपातळीवर आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही संकल्पना ग्रामीण रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, कक्षाचे अध्यक्ष डॉ. श्याम गावंडे, आणि समाजसेवा अधीक्षक पवन गुल्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे यांनी फीत कापून कक्षाचे उद्घाटन केले आणि याठिकाणी होणाऱ्या मदतीची माहिती घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.