शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह प्राधान्याने उभारावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
अमरावती : शासनाचा शाळांमधील पटसंख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही पटसंख्या वाढवताना दर्जेदार शिक्षणासोबतच शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, ई सुविधा प्राधान्याने उभारावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, शिक्षणाधिकारी अनिल मोहोरे, प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी यात सुधारणा कराव्या लागतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर फंड, तसेच नागरिकांच्या योगदानातून शाळांना आवश्यक असणाऱ्या सोयी उपलब्ध कराव्यात. रोजगार हमी योजनेतून शाळांना संरक्षक भिंती, वृक्ष लागवड करण्यात यावी.
राज्यभर आयडॉल शिक्षकांशी संवाद साधण्यात येत आहे. यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमधील शिक्षक नावीन्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. विविध क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. ही परंपरा कायम राहावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यावर्षीपासून सीबीएससी शाळांमधील चांगल्या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीमधून शाळांच्या छोट्या समस्या निकाली निघू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात. या भेटीमधून शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात. शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पालकांचा सहभाग जाणीवपूर्वक घेण्यात यावा. शिक्षकांना जागतिक पातळीवरील ज्ञानाच्या पद्धती अभ्यासण्यासाठी विदेश दौरे आयोजित करण्यात येतात. येत्या काळात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचाही यात समावेश केला जाईल. त्यामुळे शिक्षणविषयक प्रशिक्षण देताना लाभ होईल.
येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. तसेच राज्यभरातील प्रत्येक अधिकारी एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. या शाळा संबंधित अधिकाऱ्यांना दत्तक दिल्या जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमधील प्रश्न, समस्या सोडविण्यात येणार आहे. राज्यभरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.