अमरावतीत जुन्या हिंदी गीतांची स्वरसंध्या; बालगायकाच्या सादरीकरणाने मिळवली दाद”

अमरावती : शहरातील जोशी हॉल येथे “म्युझिक इज द मेडिसिन ऑफ माईंड” या संकल्पनेवर आधारित एक सुरेल संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंगला गावंडे यांच्या पुढाकाराने आणि अनमोल सुर संगम ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांच्या मनाला भूरळ घातली.
1950 ते 1970 च्या दशकातील ब्लॅक अँड व्हाईट काळातील अजरामर गाण्यांना अमरावतीच्या विविध गायक-गायिकांनी सुरेल सादरीकरणातून नवसंजीवनी दिली. लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील “हिट” गाण्यांना नव्या पिढीच्या कलाकारांनी सुंदर सादर केलं.
या कार्यक्रमात मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. चंदू सोजतीया आणि चंद्रकांत पोपट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचं सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते एका छोट्या बालगायकाने सादर केलेलं “एक लड़की भीगी भागी सी…” हे गाणं. त्याच्या निरागस आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांची मनं जिंकली. या बालगायकाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं.
कार्यक्रमाच्या शेवटी एक अनपेक्षित आनंद देणारा क्षण आला, जेव्हा स्वयं नरेंद्र वानखडे आणि चंद्रकांत पोपट यांनीही एक एक गाणं सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.
एकंदरीत, अमरावतीच्या संगीतप्रेमींना जुन्या आठवणींमध्ये हरवून नेणारा आणि सुरेल स्वरांनी सजलेला हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.