गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला, कठोरा बुजरूक येथे गोरक्षकांनी अडविले वाहन

अमरावती : कठोरा बुजरूक-टाकळी गावाच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारास गोवंशांची तस्करी करत असलेले एक वाहन गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. या वाहनाचा पाठलाग करून टाकळी गावाजवळ बोलेरो पीकअप अडवण्यात आले असून, त्यामध्ये 15 गोवंश आढळून आले आहेत.
हे वाहन विना क्रमांकाचे असल्याने सुरुवातीला संशयास्पद वाटले. विशेष बाब म्हणजे या बोलेरो पीकअप वाहनाला एक स्कॉर्पिओ टो-चन करताना दिसून आली होती, ज्यामुळे गोरक्षकांचा संशय बळावला आणि त्यांनी पाठलाग करून वाहन थांबवले.
चालकाने परिस्थिती पाहून घटनेच्या ठिकाणाहून पळ काढला, मात्र गोरक्षकांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनासह सर्व 15 गोवंश ताब्यात घेतले.
ही सर्व गोवंशे सुरक्षितरित्या ‘गाऊ फाउंडेशन श्री भगवान परशुराम’ येथे हलवण्यात आली असून त्यांना जीवनदान मिळाले आहे.
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याकडून सध्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तस्करी प्रकरणाच्या पुढील तपासाला गती देण्यात येत आहे.