तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

तिवसा : तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरीत १ मे च्या दुपारी परिसरात हवामानात अचानक बदल झाला. सूर्यप्रकाश असतानाच वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आणि त्यासोबतच अर्धा तास बोराएवढ्या गारांचा मारा झाला.
ही गारपीट जरी फार काळ टिकली नसली तरी, या भागातील कांद्याची काढणी सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने मोठ्या स्वरूपाचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, मात्र काही भागांत कांद्याचे पीक आडवे आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अचानक आलेल्या गारपीटीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला थांबून आश्रय घेतल्याचे चित्र दिसून आले.
हवामान खात्याने यापुढील दोन दिवसांसाठी हलक्या पावसाचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांनी पीक संरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.