तुम्ही बोला नाहीतर आम्ही तुम्हाला मारणार टोला – बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अकोला : अकोल्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा पार पडला. पण या सोहळ्याचा मंच एक प्रखर राजकीय व्यासपीठ बनला तेव्हा बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर हल्ला चढवला. “बोला… नाहीतर टोला!” या शब्दांत बच्चू कडू यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यांच्या भाषणात फक्त शब्द नव्हते, तर राग, रोष आणि जनतेच्या भावना होत्या. बच्चू कडू यांनी सरकारला 6 जूनपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले. विदर्भातील सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करा! यातच त्यांनी 14 जून रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्याचं जाहीर आवाहन केलं. पाहिलं तर हा फक्त राजकीय इशारा नाही, तर विदर्भातील प्रश्नांवर असहाय्य झालेल्या जनतेचा आक्रोश आहे. याच कार्यक्रमात बच्चू कडूंनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि केंद्र सरकारवर टीका करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.