पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज, पुण्यातून तरुणाला अटक

पुणे : भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल आणि अनुचित संदेश देऊन त्रास दिल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातील एका रहिवाशाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तिने असं कृत्य करण्यामागचं कारण पोलिस आता तपासत आहेत.
तक्रारीच्या आधारे तपास
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार कॉल आणि आक्षेपार्ह संदेश देऊन त्रास देत होता. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (२६) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन याबाबत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह BNS च्या कलम ७८ आणि ७९ अंतर्गत एफआयआर नोंदवली.
या तक्रारीनंतर, सायबर पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला पुण्यातून अटक केली. आरोपीचा असं करण्यामागचा हेतू काय होता? आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे का याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात राहणाऱ्या मूळ कोल्हापूरच्या तरुणाने मुंबईकर तरुणीसोबत मैत्री वाढवली. त्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, ती गरोदर राहिल्याने तिचा गर्भपातही घडवून आणला, मात्र काही दिवसातच त्याने तिला सोडून दिलं. धक्कादायक म्हणजे तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन त्याने लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीच्या सोबत ओंकार प्रधान या तरुणाने मैत्री केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. दरम्यान, काही दिवसानंतर ओंकारने तिला सोडून दिलं. इतकंच नाही, तर प्रेयसीच्या मैत्रिणीसोबतच तो पळून गेला आणि त्याने तिच्यासोबत लग्नही केलं. हा प्रकार समजताच तरुणीचा संताप झाला आणि तिने पोलिसात धाव घेतली.