भाविकांसाठी आजपासून उघडली केदारनाथची कवाडं

Kedarnath Dham Yatra 2025 : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचं धाम असणाऱ्या श्री केदारनाथ धाम येथील मंदिराची कवाडं शुक्रवारी अतिशय पवित्र मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम येधील मंदिराची कवाडं शीतकाळात अर्थात या भागात हिमवृष्टी सुरु झाल्यानंतर बंद केली जातात आणि पुन्हा ठराविक अवधीनंतर श्री केदार भाविकांच्या भेटीसाठी सज्ज होतात. यंदाच्या वर्षी केदारनाथ धाम येथील कवाडं 2 मे 2025 च्या सकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर उघडण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तर, पुरोहिचतांच्या मंत्रपठणानं हा संपूर्ण परिसर निनादून गेला. मंगलध्वनींनी केदारनाथ धाम परिसरात सकारात्मक लहरींचा वावर उपस्थितांना जाणवला.
बाबा केदार यांची शुभयात्रा…
मंदिराची कवाडं खुली करण्यापूर्वी बाबा केदारनाथ यांची पवित्र पालखी काढण्यात येते. यंदाच्या वर्षी 27 एप्रिल रोजी उखीमठ इथं असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिरात भैरवनाथाच्या पुजेनं या यात्रेची सुरुवात झाली. यानंतर बाबा केदार यांच्या पालखीनं केदारनाथ धामच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. 28 एप्रिल रोजी बाबा केदार यांची पालखी गुप्तकाशी इथं पोहोचली. पुढे 29 एप्रिलला फाटा आणि 30 एप्रिल रोजी गौरीकुंड इथं ही पालखी पोहोचली आणि 1 मे रोजी ही डोली/ पालखी केदारनाथ मंदिरात पोहोचली.