यवतमाळमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 400 रक्तदात्यांचे योगदान

यवतमाळ – दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 400 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर दिव्यांग साहेबराव पवार आणि त्यांच्या पत्नीने दिलेले योगदान विशेष आकर्षण ठरले.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी भूषवले. ते म्हणाले, “रुग्णांना रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी, यासाठी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र दिनी हे रक्तदान शिबिर घेत आहे. उन्हाच्या कडाक्यातही शिवसैनिक रक्ताचे नाते जपत आहेत.”
शिबिरात शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जीवनदादा पाटील, डॉ. गिरीश जतकर (अधिष्ठाता), डॉ. सुरेंद्र भुयार (अधीक्षक) आणि रक्तपेढी प्रमुख विकास येडशीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
रक्तदात्यांचा उत्साह आणि महिलांचा लक्षणीय सहभाग
शिबिरात जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिक, युवक, नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांची सहभाग संख्या विशेष लक्षवेधी होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व विशेष भेटवस्तूंनी सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी शिबिराचे नियोजन शिवसेनेचे रूग्णसेवक विकास क्षीरसागर यांनी केले होते. शिवसेनेच्या विविध आघाड्यांतील पदाधिकारी, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेना व महिला आघाडीचे सदस्य तसेच रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
दिव्यांग दांपत्याचे प्रेरणादायी योगदान
यावेळी दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील साहेबराव हरसिंग पवार व त्यांच्या पत्नी विमल पवार यांनी रक्तदान करून उपस्थितांमध्ये प्रेरणेचे स्रोत ठरले. साहेबराव हे जन्मतःच पोलिओग्रस्त असून त्यांना एक हात नाही, तरीही ते दरवर्षी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. संजय राठोड यांच्या प्रेरणेने हे रक्तदान शिबिरात नियमित सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.