वाढदिवसाचा उत्सव नाही, सेवा हेच समाधान – आमदार साजिद खान पठाण यांचा अनोखा उपक्रम

अकोला : अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या वाढदिवसाचा उत्सव न करता समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. देशात काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, तसेच पीडित घटकांवर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर, आमदार पठाण यांनी यंदा वाढदिवस शाळकरी गरजू विद्यार्थ्यांसाठी समर्पित केला.
गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे दान
यंदाच्या वाढदिवशी कोणताही केक, फलक, फटाके किंवा जाहिरातबाजी न करता, आमदार पठाण यांनी शालेय साहित्य दान करण्याचे आवाहन जनतेला केले होते.
या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून वह्या, पेन, नोटबुक्स, शालेय बॅग्स इत्यादी साहित्य जमा झाले आहे.
शहरवासीयांचा सकारात्मक प्रतिसाद
अकोला शहरात आमदार पठाण यांच्या या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमाचे प्रचंड कौतुक होत आहे. अनेक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असून, हे साहित्य लवकरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
काय म्हणाले आमदार पठाण?
“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणं हीच खरी सेवा आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेला सन्मानाने आणि संवेदनशीलतेने जगण्याचे आवाहन केले.