गाडीच्या वादातून मित्राचा खून; नागपूरच्या पारडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक
नागपूर : नागपूर शहरातील पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 22 एप्रिल रोजी एक धक्कादायक हत्या घडली असून गाडीच्या किरकोळ वादातून एका युवकाचा जीव घेतला गेला आहे. सतीश मेश्राम (वय 31) या सेंटरिंग काम करणाऱ्या युवकाची त्याचाच ओळखीच्या मित्राने धारदार हत्याराने हत्या केली आहे.
घटनेचा तपशील
सतीश मेश्राम आणि आरोपी हे एकमेकांचे जुने मित्र असून त्यांचे सतत येणे-जाणे होते. काही दिवसांपूर्वी सतीशने आरोपीच्या बहिणीच्या नवऱ्याची गाडी घेतली होती, मात्र ती वेळेत परत केली नव्हती. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सतीशने रागाच्या भरात आरोपीच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती, ही गोष्ट आरोपीच्या मनात राहून गेली.
22 तारखेला दोघांची भांडेवाडी रेल्वे ट्रॅकजवळ पुन्हा भेट झाली आणि जुन्या वादावरून दोघांत वाद झाला. त्यावेळी आरोपीने संतापून सतीशवर धारदार हत्याराने वार करत त्याला ठार केले.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. अवघ्या अर्ध्या तासात तपास सुरू करून केवळ दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपी पळून जाण्याआधीच जेरबंद झाला.
मृतक सतीशवर यापूर्वी IPC 400 अन्वये गुन्हे दाखल होते, मात्र त्याचा कोणताही व्यक्तिगत शत्रू नव्हता. आरोपीवर यापूर्वी कुठलाही गंभीर गुन्हा दाखल नव्हता. गाडीच्या वादातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.