जातीय जनगणनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; दर्यापूरमध्ये काँग्रेसतर्फे जल्लोष

दर्यापूर : देशातील सर्वसामान्य नागरिकांना समान हक्क मिळावेत यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियानांतर्गत जातीय जनगणनेची मागणी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून सतत पाठपुरावा करून अखेर केंद्रातील सरकारने आज जातीय जनगणनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरात आणि विदर्भात आनंद व्यक्त केला जात असून, दर्यापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात शहरात फटाके फोडून, गुलाल उधळून, “राहुल गांधी जिंदाबाद” अशा घोषणा देत जनतेने जल्लोष केला. या कार्यक्रमास अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना नेत्यांनी सांगितले की, “ही केवळ जनगणनेची नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेली ऐतिहासिक पावले आहेत. राहुल गांधी यांचे योगदान अतुलनीय आहे.”