पतीने केली पत्नी आणि मुलीचे हत्या, अकोल्यातील धक्कादायक घटना
अकोला : अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तार फैल परिसरात एक हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून सूरज गणवीर ऊर्फ गोटिया या व्यक्तीने स्वतःच्या पत्नी आणि निष्पाप मुलीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सूरज गणवीर याने आपल्या २५ वर्षीय पत्नी अश्विनी गणवीर आणि तीन वर्षांच्या आयशा गणवीर या चिमुकलीचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एसडीपीओ सतीश कुलकर्णी, प्रभारी ठाणेदार अरुण परदेसी तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
पोलिसांनी आरोपी सूरज गणवीर याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. हत्या घरगुती वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरले आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांची चौकशी सुरू आहे.
अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन