महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिली मध्य झोन कार्यालयाला भेट
अमरावती – अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी शुक्रवार, दिनांक २ मे २०२५ रोजी मध्य झोन क्रमांक २ राजापेठ येथील कार्यालयाला अचानक भेट देत ई-ऑफिस प्रणालीची कार्यपद्धती आणि झोन कोठ्यातील भंगार साहित्याची सखोल तपासणी केली.
या भेटीदरम्यान आयुक्तांनी मध्य झोनमधील ई-ऑफिस प्रणालीचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांकडून सदर प्रणाली कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील पाहिले. त्यांनी सांगितले की, “प्रशासनाने ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनपाच्या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. या प्रणालीमुळे कामकाज वेगाने पार पडेल तसेच नागरिकांच्या तक्रारी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतील.”
यावेळी आयुक्त कलंत्रे यांनी हेही स्पष्ट केले की, “आता विकासकामांच्या फाईल्स प्रत्यक्ष हाताळल्या जाणार नाहीत, तर त्या थेट ई-प्रणालीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत.”
त्यानंतर आयुक्तांनी झोन क्रमांक २ राजापेठच्या बाजूला असलेल्या मध्यवर्ती कोठ्याची पाहणी करत निरुपयोगी भंगार वस्तूंची तपासणी केली. त्यांनी या वस्तूंना योग्यरित्या वर्गीकृत केले आहे का, याची खातरजमा केली.
या दौऱ्यात सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, दिनेश हंबर्डे, मंगेश कडू, अभियंता लक्ष्मण पावडे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण व मध्य झोनचे इतर कर्मचारी उपस्थित होते.