मेघनाथपूर फाट्यावर बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
अमरावती – उन्हाची तीव्रता वाढत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस एकामागून एक बंद पडत आहेत. आज सकाळी ११:३० च्या सुमारास बस क्रमांक MH-06-S-8837 ही लाल परी मेघनाथपूर फाटा येथे अचानक बंद पडल्याने तब्बल ५० ते ६० प्रवाशांचे हाल झाले.
बस बंद पडण्यामागील कारण पुन्हा एकदा ‘ओव्हरहिटिंग’ हेच ठरले. सध्या अमरावती जिल्ह्यात ४३-४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे, आणि त्याचा फटका थेट या जुनाट बसेसना बसतो आहे. बस गरम झाल्यानंतर तिच्यातील हिरव्या रंगाचा कुलंट रस्त्यावर बाहेर पडतो – म्हणजेच बस थेट रस्त्यावर ‘उलटी’ करते, आणि नंतर ती बंद पडते.
आजच्या घटनेत प्रवाशांमध्ये विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, आणि लग्न समारंभासाठी प्रवास करणारे नागरिक होते. ते अर्धा तास उन्हातच उभे राहिले. त्यानंतर दुसरी बस आल्यावर त्यांना परतवाडा येथे पाठवण्यात आले.
ही घटना फक्त एक उदाहरण नसून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वारंवार या स्वरूपात बंद पडत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सुसंवादाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांतून जोरदार मागणी सुरू झाली आहे की, “या जुनाट डिझेल बसेस बंद करून तात्काळ इलेक्ट्रिक बसेस सुरू कराव्यात.”
– नितेश किल्लेदार