यवतमाळ जिल्ह्यातील वाळू चोरीवर कठोर कारवाई करा – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळु चोरीच्या घटना पुढे येत आहे. अशा प्रकारे वाळू चोरी होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करा. उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात स्वतंत्र आढावा घेण्यात येतील, असे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विभागीय आयुक्तांनी महसूल, जिल्हा परिषद, जलसंधारण, पाणी टंचाई आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाळू चोरी अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्हाभर वाळू चोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करा. महसूल कर्मचाऱ्यांना रेती चोरट्यांकडून मारहाणीसारखे प्रकार होत असल्यास आणि वारंवार रेती चोरीच्या घटनेत सहभागी असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देखील विभागीय आयुक्तांनी दिले.
सद्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणांची मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कार्यालयातील दस्तऐवजांचे चार गठ्ठा पद्धतीने वर्गीकरण करा. आपले कार्यालय या मोहिमेंतर्गत अधिकाधिक चांगले कसे होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत जास्तीज जास्त शेतकऱ्यांची येत्या काही दिवसात नोंदणी करा. विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी येत्या दिवसात मोठ्या प्रमाणावर अर्ज येणार आहे. त्यामुळे शाळास्तरावरच विशेष शिबिरे घेऊन दाखले देण्याची मोहिम राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
सर्वसामान्य नागरिक आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेणे यंत्रणेकडे तक्रारी दाखल करत असतात. अशा तक्रारींवर वेळेत आणि तक्रारकर्त्यांचे समाधान होईल अशी कार्यवाही होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत होण्यासाठी आठवड्यातून काही वेळ याकामासाठी राखीव ठेवावा. विविध विभागांचे अधिकारी शासकीय कामानिमित्त जिल्ह्यात दौरे करत असतात. अशावेळी रस्त्यातील गावात ग्रामस्तरावरील किमान एका कार्यालयास भेट द्यावी. गावकऱ्यांशी संवाद साधावा. रोजगार हमी योजनेचे काम पहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याचे काम करतांना जास्तीत जास्त लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून कामे करा. ही अतिशय चांगली योजना आहे. याकडे आपण योजना म्हणून न पाहता सामाजिक दृष्टीकोण ठेऊन प्रामाणिक प्रयत्न करून काम करा. गाळ काढण्याच्या कामाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि गटविकास अधिकारी स्तरावर नियोजन करा. ज्या ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती असते, त्या भागातील तलावांमधून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या.
जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा
विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्याच्या आराखड्याची माहिती श्री.पत्की यांनी दिली. जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची स्थिती जाणवणार नाही, याकडे जातीने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाईवर विशेष लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी दुषीत पाणी आहे, असे स्त्रोत तत्काळ बंद करावे, असे सांगितले.
‘शासन आपल्या मोबाईलवर’चे कौतूक
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचे आयुक्तांनी कौतूक केले. हा अतिशय चांगला उपक्रम असून लोकोपयोगी योजनांचे व्हिडीओ तयार करून प्रसारीत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. इतर विभागाच्या योजना देखील याद्वारे देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी सेतू, ई-ऑफीस, ई-टपाल, तक्रार निवारण, पीजी पोर्टल, रोहयो, आधार सिंडींग, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, जलयुक्त शिवार, शेतकरी आत्महत्या, पीए जनमन, घरकुल योजना, जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा देखील आढावा घेतला.