राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पुढील सात दिवस ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा

राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत 3 ते 10 मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यांत जाणवू शकतो. तसंच, गारपिटीचीही शक्यता आहे. मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.
महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ अंशापर्यंत असून तर काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पंजाबपासून राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे.
मुंबईसह ठाणे पालघर आणि भागात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.