जन्मदात्या आई आणि बहिणीकडूनच तरुणाची हत्या

सांगली : सांगलीतील तासगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने आणि बहिणीनेच तरुणाची हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर तरुणाने आत्महत्या केल्याचा बनावदेखील मायलेकींनी रचला होता. 19 वर्षीय मयूर माळी असं हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संगीता माळी व बहीण काजल माळी या दोघी मायलेकींनी मिळून मुलाच्या हत्येचा बनाव रचला होता. मात्र तासगाव पोलिसांनी वेगाने चक्र वेगाने फिरवली आणि घटनेचा तपास करत आहेत.
तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी आणि बहीण काजल माळी या दोघींनी आधी तिला गुंगीचे औषध दिलं होतं. त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. मुलाच्या खूनानंतर त्यांनी मृतदेह पेटवून दिला आणि आग लावून मृत्यू झालाचा बनाव केला. घरात आग लागून मृत्युमुखी पडल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी दोघींची चौकशी केली आणि त्यांचे पितळ उघडे पडले. मायलेकींच्या खुनाच्या बनावाचा पर्दाफाश करत दोघींना बेड्या ठोकल्या आहेत.
मयूर माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री तो मित्रांसोबत बोलत थांबला होता. नंतर तो घरी गेला. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराच्या आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. मात्र आगीत होरपळून मयूर माळीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी मयूर माळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला होता. त्यावेळी डोक्यावरील जखमायामुळं त्यांचा संशय बळावला आणि त्यांनी संगीता आणि काजल दोघींना चौकशीसाठी बोलवले.
दोघींच्या कबुलीजबाबानुसार, संगीता आणि काजलने त्याला शनिवारी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर शुद्ध हरपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. मयूरचे आणि त्याच्या आई-बहिणीचे सातत्याने वाद होत असत. या वादातूनच दोघींनी त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.