तिवसा तालुक्यात २२ वर्षीय कुस्तीपटू मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

तिवसा : तिवसा तालुक्यातील एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. शहरातील आजाद चौकात राहणाऱ्या २२ वर्षीय कुस्तीपटू कु. प्राप्ती सुरेश विघ्ने हिचा आज सोमवार, दिनांक ५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी तीव्र उलट्या व पाय दुखण्याची तक्रार झाल्यानंतर कु. प्राप्तीने आपल्या भावाला फोन करून “मी घरी येत आहे” असे सांगितले होते. त्यानुसार, तिचा भाऊ तिला अमरावतीवरून सकाळी ९:३० वाजता घरी घेऊन आला. परंतु घरी आल्यानंतर विश्रांती घेत असतानाच तिची प्रकृती अचानक बिघडली. नातेवाईकांनी तातडीने तिला उपचारासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे.
कु. प्राप्तीचे वडील भाजी विक्रेते तर आई मजुरीचे काम करत असून त्यांची ही एकमेव मुलगी होती. आपल्या २२ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचे अकस्मात निधन झाल्याने विघ्ने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. परिसरातही शोककळा पसरली आहे.