“आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी” — मनसेचं अनोख आंदोलन
अचलपूर : अचलपूर तालुक्यातील असदपूर ते येवता व्हाया अचलपूर या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता थेट पालकमंत्र्यांच्या दारात पोहोचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली “आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी” या अभिनव आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली.
कडाक्याच्या उन्हातही विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. आंदोलनाचं नेतृत्व मनसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी केलं असून, शैक्षणिक प्रश्नांवर असं ठोस आणि लक्षवेधी आंदोलन क्वचितच पाहायला मिळतं.
रस्ता खराब, शिक्षण थांबतं!
ग्राम असदपूर ते ग्राम येवता व्हाया अचलपूर हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. दररोज ५० ते ६० विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि जेष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात.
पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद पडतो, त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या फेऱ्या बंद होतात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मागील वर्षी विद्यार्थ्यांचे तीन महिने एस.टी. सेवा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.
आंदोलन, उपोषण, निवेदनं… तरीही प्रशासन गप्पच!
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीही लोटांगण आंदोलन, उपोषण, आणि पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषद व संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होतंय. याच निषेधार्थ “शाळा पालकमंत्र्यांच्या दारी” ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
आंदोलनात सहभागी प्रमुख मनसैनिक –
पुरुषोत्तम काळे – मनसे तालुका अध्यक्ष
शरयू पाजनकर – महिला सेना जिल्हाध्यक्ष
शीतिजा बारबुदे, मानसी आडवीकर, स्नेहल राठोड, ईश्वरी ढोके, सोनू मुंडाने, वेदांती जवंजाळ
दिलीप गुलेरकर, विजय साखरे, अमोल ढेंगेकर, सतीश भानगे, विशाल वऱ्हेकर
सचिन बावनेर – उपजिल्हाध्यक्ष
विक्की थेटे – कार्यकर्ता
विद्यार्थ्यांचं भावनिक आवाहन – “शाळा चालू ठेवा, रस्ता द्या!”
पुढील शैक्षणिक सत्र जुन महिन्यात सुरू होत असल्याने त्याआधीच रस्त्याची डागडुजी व्हावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.