नागपूर: गांधीबाग नंगा पुतळा परिसरातील कापड दुकानाला भीषण आग

नागपूर : नागपूर शहरातील मध्यवर्ती गांधीबाग नंगा पुतळा परिसरात असलेल्या एका कापडाच्या दुकानाला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुकानातून प्रचंड धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसत असल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून परिसरातील दुकाने आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.