पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलीचा संघर्षातून विजय – खुशी काछीने बारावीला मिळवले 74% गुण

अकोला : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अकोला जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत 74 टक्के गुण मिळवून यशाची घोडदौड गाठली आहे. ही यशोगाथा आहे खुशी संतोष काछी हिची, जी शेलार फाईल, अकोला येथील रेल्वे पुलाखालील एका सर्वसामान्य घरात राहते.
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असलेल्या खुशीने, आपल्या वडिलांच्या पाणीपुरी व्यवसायाला पहाटे ४ वाजल्यापासून मदत करत करत अभ्यासासाठी वेळ काढला आणि हाच अभ्यास तिला आज यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे.
श्रम, शिक्षण आणि आत्मबल यांचा संगम
खुशीचे वडील आणि दोन काका मिळून पाणीपुरी तयार करून ती विक्रीसाठी चिल्लर विक्रेत्यांना पुरवतात. या मेहनतीतून त्यांना दररोज फक्त 500 ते 700 रुपयांची मिळकत होते. तरीही हा कुटुंब आनंदी आहे आणि त्यांनी अलीकडेच कर्ज काढून नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे.
खुशीने 600 पैकी 444 गुण मिळवले असून तिचा टक्का 74% आहे. दहावीतही तिने 75% गुण मिळवून यश मिळवले होते. कॉलेजमध्ये नियमित हजेरी, ग्रंथालयातील वाचन आणि खेळांमध्ये सहभाग घेऊन क्रीडा गुण सवलत सुद्धा तिने मिळवली आहे.
यशाचे श्रेय आई-वडिलांना
खुशीने सांगितले की, “मी माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना, शिक्षकांना आणि प्राचार्यांना देते. त्यांनी माझ्या आयुष्यात उजेड आणला.”
प्राचार्य माधव मुनशी, उपप्राचार्य हातवळणे, प्रा. रत्नपारखी तसेच वर्गशिक्षक प्रा. नंदकिशोर थूटे यांच्या मार्गदर्शनाचा तिला विशेष फायदा झाला. अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळानेही तिच्या यशाचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भविष्यात एमबीए करून देशासाठी कार्य करणार
खुशीची इच्छा आहे की, ती भविष्यात एम.बी.ए. करून देशासाठी काहीतरी चांगले करेल. तिची ही जिद्द, संघर्ष आणि यश ही आजच्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.