रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? करजगाव-वणी-सुलतानपूर रस्त्याची दयनीय अवस्था

तिवसा : तिवसा तालुक्यातील करजगाव, जावरा, फत्तेपूर, वणी, सुलतानपूर या गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांतूनच रस्ता जातोय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
या रस्त्याचा उपयोग करणाऱ्या नमस्कारी, काटसुर, इसापूर, वरुड, दापोरी आदी गावांतील नागरिकांनाही दररोज प्राण धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एकूण १८ किमी लांबीचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पासून ममदापूर मार्गे जात असून तिवसा-चांदूरबाजार राज्यमार्गास करजगाव मार्गे जोडतो.
या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक होत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. बैलगाडी तर दूरच, पायी चालणं सुद्धा धोक्याचं झालं आहे. यामुळे अनेक अपघात झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती रोशनी पूनसे आणि ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. ही मागणी तत्कालीन आमदार अँड. यशोमती ठाकूर यांच्याकडे लावून धरली गेली होती. यशोमती ठाकूर यांनी रस्त्याच्या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष देत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – २ (संशोधन व विकास विभाग) अंतर्गत रस्त्याचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.
त्याअंतर्गत रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद अमरावती कडून मंजूर करण्यात आला होता. मात्र, अचानक लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम रखडले आणि आजही रस्त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया फाईलपुरतीच मर्यादित राहिली आहे.
चार-पाच महिने उलटूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पूनसे यांनी एक निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद मसलदी, हैबत गाडगे, रवी जवंजाळ, दशरथ कठाणे, शामभाऊ कोंडे, प्रकाश गाढवे, विनोद मोंढे, सुधीर लवनकर, निवृत्ती मुकादम आदी उपस्थित होते.