रेवसा येथे साकार होणार अमरावतीतील भव्य इस्कॉन मंदिर; ८ मे रोजी भूमिपूजन सोहळा

अमरावती : रेवसा रोडवरील मालू सिटी येथे भव्य इस्कॉन मंदिर साकारण्यात येणार असून, यासाठी मालू कुटुंबीयांनी तब्बल १ लाख चौरस फूट भूखंड इस्कॉन संस्थेला दान दिला आहे. हे मंदिर स्व. प्रवीण मालू आणि स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘बालकृष्ण धाम’ या नावाने उभारले जाणार आहे.
८ मे रोजी सायं. ५ वाजता भूमिदान व भूमिपूजन सोहळा मालू सिटी येथे पार पडणार असून, या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच इस्कॉन महाराष्ट्राचे क्षेत्रीय सचिव प.पू. श्रील लोकनाथ स्वामी महाराज व प.पू. भक्तिपद्म सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच दिवशी स्व. प्रवीण व स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतिद्वाराचेही भूमिपूजन होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, संजय राठोड, आशीष जयस्वाल, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, डॉ. सुनील देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
स्व. प्रवीण मालू यांचे अपूर्ण स्वप्न पूर्णत्वास
स्व. प्रवीण मालू यांनी २३ मार्च २०२२ रोजी इस्कॉनला भूदानाची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र २०२१ मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या कन्या प्रिया व पूर्वा मालू, भाचे वरुण व प्रज्वल मालू यांनी पुढाकार घेऊन हे स्वप्न पूर्णत्वास नेले. इस्कॉन ट्रस्टच्या उपस्थितीत भूदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित जमीन एनए प्रमाणपत्रासह अकृषक वर्गात रूपांतरित करण्यात आली आहे.
राज्यातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर
सुमारे २ एकर क्षेत्रात उभारण्यात येणारे हे मंदिर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर ठरणार आहे. येथे सत्संग भवन, भक्त निवास, अतिथी निवास, संस्कार भवन, अध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र, भक्त प्रल्हाद स्कूल, युवा सेमिनार हॉल, आधुनिक गौशाळा आणि इस्कॉन म्युझियम उभारले जाणार आहे.
रुक्मिणी जन्मोत्सव आणि ब्रह्मोत्सवाचे आयोजन
या दिवशी श्री रुक्मिणी जन्मोत्सव आणि २५व्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून, ७ ते ८ हजार भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय उपस्थिती
या सोहळ्याला मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका यांसारख्या देशांतील इस्कॉनचे प्रमुख सदस्य कीर्तनासाठी उपस्थित राहणार आहेत. येत्या ३ ते ४ वर्षांत हे मंदिर उभारणी पूर्ण करून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.