जुन्या वैमनस्यातून ज्योती कॉलनीत युवकाची निर्घृण हत्या; पाच आरोपी अटकेत

अमरावती : शहरातील गोपाल नगर येथील ज्योती कॉलनीत जुन्या वैमनस्यातून 23 वर्षीय युवकाची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजापेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हत्या झालेला युवक देवांशु अनिल फरकाडे (वय 23, रा. त्रिमूर्ती नगर) याच्यावर मंगळवारच्या रात्री अचानक हल्ला करण्यात आला. आरोपींनी धारदार चाकूने त्याच्यावर वार करून घटनास्थळावरून दुचाकीने पलायन केले.
घटनेनंतर देवांशुने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळील एका घरात आश्रय घेतला, परंतु आरोपींनी पाठलाग करून त्याच्या छातीवर गंभीर वार करत हत्या केली. तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट व डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला.
- घटनेनंतर अवघ्या काही तासांत राजापेठ डीबी पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये:
- राज आठवले (वय 20)
- ओम खडसे (वय 18)
- हर्षल जाधव (वय 18)
याशिवाय दोन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त गणेश शिंदे देखील रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सखोल चौकशी केली जात आहे. राजापेठ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या दिशांनी तपास सुरू केला आहे. हत्येतील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.