पाकिस्तानला भारताचं जोरदार प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरनंतर अकोल्यात जल्लोष, VHP आणि बजरंग दलाने साजरा केला विजय

अकोला : एकदा भारताने दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली असून, पहेलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार हवाई हल्ले केले. या कारवाईने देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातही या कारवाईचा उत्साह दिसून आला असून, अकोल्यातही नागरिकांनी जल्लोष साजरा केला. अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. या वेळी “पाकिस्तान मुर्दाबाद”, “भारतमाता की जय” अशा घोषणा देत कारवाईचे स्वागत करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले की, “भारताने उशिरा का होईना पण योग्य पाऊल उचलले आहे. या हल्ल्याने दहशतवादी संघटनांना कडक इशारा मिळाला आहे की, भारत आता गप्प बसणारा नाही.”
ऑपरेशन सिंदूर या कोडनेमने राबवलेल्या या हवाई कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याचा नेमका परिणाम आणि बळी गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नसली, तरी या निर्णयामुळे देशभरात सरकारच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.