आंबा-मिलेट महोत्सवातून ग्राहक, उत्पादकांना लाभ होणार – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
आंबा मिलेटस् महोत्सवाचे आयोजन
अमरावती : कृषी पणन मंडळातर्फे आंबा व मिलेटस् हा चांगला महोत्सव राबविण्यात येत आहे. यामुळे उत्पादकांना ग्राहक मिळण्यासोबतच ग्राहकांनाही उत्कृष्ट उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
महोत्सवाचे उद्घाटन प्रथम येणाऱ्या ग्राहकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. यावेळी सहकारी संस्था सहनिबंधक चैतन्य नसाणे, जिल्हा उपनिबंधक श्री. कुंभार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, कृषी पणन मंडळाचा उपक्रम स्तुत्य असून यामध्ये मध्यस्तांची संख्या कमी होऊन शेतकरी आणि प्रक्रियादार हे ग्राहकांच्या जवळ येतील. यामुळे ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या उत्पादनाची जाणीव शेतकऱ्यांना होईल. आंबा महोत्सवामुळे हापूस, केशर आणि गावरान आंब्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा उपलब्ध झाला आहे. मिलेटस आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होतील. महोत्सवातून ग्राहक आणि शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने महोत्सवाला सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी प्रक्रियादार यांना मिलेट आणि हापूस, केशर, गावरान आंबा या फळांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य कृषी पणन मंडळातर्फे आंबा मिलेटस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. 12 मेपर्यंत हा महोत्सव जाधव पॅलेस येथे सुरू राहणार आहे. यात 45 उत्पादक आणि कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी वीस वर्षापासून विविध महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिलेट धोरणानुसार ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी आदी मिलेटसला बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी महोत्सव घेण्यात येते. महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.