ऑपरेशन सिंदूर”च्या यशावर अकोल्यात जल्लोष; वंचित बहुजन आघाडीने दिली भारतीय सैनिकांना सलामी

अकोला : पहेलगाव हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने राबवलेल्या “ऑपरेशन सिंदूर” या विशेष मोहिमेच्या यशस्वीतेचा जल्लोष अकोल्यात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अकोला शहरात फटाके फोडून, मिठाई वाटून आणि जोरदार घोषणांनी भारतीय सैनिकांना मानाची सलामी देण्यात आली.
भारतीय सैन्याने या मोहिमेत शत्रूवर निर्णायक आणि प्रभावी हल्ले करून देशाची सुरक्षा अधिक भक्कम केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे देशवासीयांमध्ये अभिमानाची लाट उसळली असून, अकोल्यात देखील देशभक्तीच्या भावना उफाळून आल्या.
कार्यक्रमावेळी “भारतीय सेना जिंदाबाद”, “जय हिंद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांची आतिषबाजी करत, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित नागरिकांसोबत देशभक्तीचा उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला – देशाच्या सुरक्षेबाबत सर्वांनी सजग राहावं आणि सैन्यदलाबद्दल आदर बाळगावा. वंचित बहुजन आघाडीने आपल्या कृतीतून एकजुटीचं दर्शन घडवत भारतीय सैन्यदलाचं मनापासून कौतुक केलं.