गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

Maharashtra Weather News : अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दुसरीकडे तामिळनाडूनपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून, त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं.
हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे.
एकंदरच ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली असून, हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
काही भागात जोरदार सरींची शक्यता अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे.
कधीपर्यंत टिकून राहणार हे पावसाळी वातावरण?
राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.