चारधाम यात्रेला गालबोट; गंगोत्रीनजीक हेलिकॉप्टर क्रॅश, 5 भाविकांचा मृत्यू

Uttarakhand Chardham Yatra Latest News : उत्तराखंडमध्ये सुरु असणाऱ्या चारधाम यात्रेला गालबोट लावणारी घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. या यात्रेदरम्यानच गुरुवारी सकाळच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये पाच भाविकांचा मृत्यू ओढावल्याचं म्हटलं जात आहे. सातजणांची आसनक्षमता असणारं हे हेलिकॉप्टर गंगोत्रीनजीकच दुर्घटनग्रस्त झालं. ज्यानंतर या घटनेची माहिती मिळताच तातडीनं आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली.
सदर माहितीनंतर घटनास्थळी पोलीस आणि सैन्यदलाची पथकंसुद्धा दाखल होत त्यांनी बचावकार्यात मदत केली. अपघात झाला तिथं टीम 108 च्या रुग्णवाहिकासुद्धा पोहोचल्या. गंगानीपासूनच पुढे नाग मंदिरापाशी खालच्या दिशेला भागिरथी नदीजवळ हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सांगण्यता येतं.
या अपघाताची सविस्तर माहिती अद्यापही प्रतीक्षेत असली तरीही दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर एरो ट्रिंक या खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येतं. ज्यामध्ये सात प्रवासी होते. यापैकी दोन प्रवासी गंभीरित्या जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून हवामानाच प्रचंड बदल झाले असून खराब हवामानानं येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागासोबतच स्थानिक यंत्रणांनीसुद्धा या भागात वादळसदृश्य परिस्थितीचा इशारा जारी केला. ज्यानंतर चारधाम यात्रामार्गातील बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली तर कुठे मेघगर्जनेसह पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी जलप्रवाह ताकदीनं प्रवाहित झाल्यामुळं कैक वाहतूक मार्ग यामुळे प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं.