नांदेडच्या सावरगाव माळ येथे भीषण पाणीटंचाई

नांदेड : हदगाव तालुक्यातील सावरगाव माळी या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतीने विकले असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला गेल्या चार दिवसांपासून कुलूप लावले असून, पाणीटंचाई संपेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
महिलांचाही ठिय्या आंदोलनात सहभाग:
या आंदोलनात महिला आणि पुरुष दोघांनीही सक्रीय सहभाग घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर दररोज ठिय्या आंदोलन करून गावकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. “पाणी ही मूलभूत गरज आहे, आणि तीच विकली जाते यासारखी लाजीरवाणी गोष्ट दुसरी नाही,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सरपंचांचा आरोप फेटाळला:
या गंभीर आरोपांवर ग्रामपंचायत सरपंच शितल पादरे यांनी प्रतिक्रिया देताना, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून, पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण केलं जात आहे, असे स्पष्ट केले आहे.