नागपुरात अवैध गोवंश कटाईचा पर्दाफाश, 12 गोवंशांची सुटका

नागपूर : नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा परिसरात अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत 12 गोवंशांची सुटका केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख यांच्या पथकाने राबवली.
गोपनीय माहितीच्या आधारे नूरानी ग्राउंड, अन्सार कॉलनी, मोमीनपुरा येथे छापा टाकण्यात आला. तेथे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी छोटेमोठे 12 गोवंश बांधून ठेवलेले असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व गोवंशांना ताब्यात घेण्यात आले असून, नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने त्यांना नजीकच्या गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
आरोपींची माहिती अशी:
अस्लम कुरेशी उर्फ डॉक्टर कुरेशी, रा. ख्वाजा पटेल ठिय्या, गाईडलाईन, मोमीनपुरा – फरार
बिलाल अंसारी, रा. मोमीनपुरा – अटकेत
या कारवाईत एकूण 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश शेख यांनी दिली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.