नागपूर विमानतळावर खळबळ, विमानातून जिवंत काडतुसे नेण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

नागपूर – विमानातून बंदुकीची जिवंत काडतुसे नेण्याचा प्रयत्न सुरक्षायंत्रणांच्या तपासणीमुळे हाणून पाडण्यात आला. शेविंग किटमधून आरोपी काडतूस नेत होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान खान सरदार खान (४०, मोठा ताजबाग, बुलंदगेट) असे आरोपीचे नाव आहे. तो बुधवारी पहाटे ५.४० वाजता इंडिगोच्या ६ ई ५००२ क्रमांकाच्या विमानाने मुंबईला जाणार होता. त्यासाठी सामानाची तपासणी सुरू होती. सीआयएसएफच्या युनिट एस चे उपनिरीक्षक पवन कुमार भीमाशंकर उपाध्याय (३७) हे कर्तव्यावर होते. सामानाची स्क्रिनींग मशीनवर तपासणी सुरू होती. इरफानची लाल रंगाची बॅग स्कॅन होत असताना त्यात बंदुकीच्या काडतुससदृष्य वस्तू दिसली. त्यामुळे पवन कुमार यांनी बॅग वेगळी काढून सखोल तपासणी सुरू केली. बॅगच्या आत शेविंग किटमध्ये त्यांना एक काडतुस सापडले तर इरफानच्या लोअर पॅंटमधून एक काडतूस आढळले. तातडीने सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बंदूक किंवा काडतूस बाळगण्याचा कुठलाही परवाना नव्हता. सोनेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मगर यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक लगेच विमानतळावर पोहोचले. पवन कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इरफानविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
इरफान हा वाहने विक्रीची कामे करतो. तो मुंबईहून वाहने आणून त्यांची नागपुरात विक्री करतो. तो मुंबईला कार आणायलाच चालला होता. एका मित्राच्या नातेवाईकाच्या फार्महाऊसवर त्याला दोन्ही काडतुसे सापडल्याचा त्याने दावा केला आहे. त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून सविस्तर चौकशी सुरू आहे.