भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाक सीमेवरून विमान परत; यवतमाळतील दोघेजण अझरबैजानमध्ये अडकले

भारत सरकारने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे पाकिस्तानी हवाई हद्देतून भारतात येणाऱ्या एका विमानाला परतावं लागलं. या विमानात सुमारे २५० भारतीय प्रवासी होते. सदर विमान अझरबैजानच्या बाकू येथे उतरवण्यात आलं असून, हे सर्व प्रवासी सध्या तिथे अडकून पडले आहेत.
विशेष म्हणजे, या प्रवाशांमध्ये यवतमाळ येथील किशोर गोपलानी आणि रेणुका गोपलानी यांचा समावेश असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशभरातील नागरिक त्या विमानात होते. या नागरिकांना अझरबैजान सरकारकडून अद्याप कुठलीही अधिकृत मदत किंवा मार्गदर्शन मिळालं नसून, ते ४८ तासांपासून अन्न, निवारा आणि परतीच्या प्रवासासाठी हवालदिल झाले आहेत.
या नागरिकांच्या नातेवाइकांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मागणी केली आहे. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
नागरिकांची व्यथा:
“आम्ही इथे अनोळखी देशात अडकून आहोत. कुठून मदत मिळणार हेच कळत नाही. आमच्या जवळचे पैसेही संपत आले आहेत,” असं म्हणत रेणुका गोपलानी यांनी सोशल मीडियावरून आपल्या स्थितीची माहिती दिली आहे.
संपर्कासाठी:
अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी भारत सरकारने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रवाशांचे नातेवाईक सतत मंत्रालयाशी संपर्क साधत असून, लवकरात लवकर या परिस्थितीवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.